Omicron Variant Symptoms And Test : कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटनं (Omicron Variant) जगाची धाकधुक पुन्हा वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सर्वच देशांनी उपययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. नव्या व्हेरियंट समोर आल्यानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांबाबत सतर्क झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशातच सर्वांच्या मनात हाच प्रश्न आहे की, ओमिक्रॉन व्हेरियंट आहे तरी काय आणि त्याची लक्षण नेमकी काय? 


काय आहेत लक्षणं? 


दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय संचारी रोग संस्थान (एनआयसीडी) च्या वतीनं सांगण्यात आलं आहे की, ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर त्या व्यक्तीमध्ये फारशी काही वेगळी लक्षण दिसून येत नाहीत. एनआयसीडीनं दिलेल्या माहितीनुसार, असंही सांगितलं जात आहे की, डेल्टाप्रमाणेच ओमिक्रॉननं बाधित झालेल्या व्यक्ती एसिम्टोमेटिक होत्या. अशातच एनआयसीडीनं असं मानलं जातंय की, ओमिक्रॉननं बाधित व्यक्तीमध्ये फारशी वेगळी लक्षण दिसत नाहीत. 


ओमिक्रॉनची सौम्य लक्षणं मात्र तरुणांना धोका अधिक, तज्ज्ञांचा दावा 


एएनआयच्या वृत्तानुसार, या व्हेरिएंटमुळे सौम्य आजार होण्याची शक्यता असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष एंजेलीक कोएट्जी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, 'या आजाराचे सौम्य लक्षणं दिसत आहे. यामध्ये स्नायू दुखणे, थकवा जाणवणे, अथवा दोन दिवस आजारी राहण्यासारखी लक्षणं दिसत आहेत. आतापर्यंत या व्हेरिएंटमुळे वास न येणं यासारखी समस्या कुणामध्येही जाणवली नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये थोड्याफार प्रमाणात कफ होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनने संक्रमित झालेले रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.'


कशी केली जाते तपासणी? 


ओमिक्रॉनच्या तपासणीबाबत सांगताना WHO नं सांगितलं की, सध्या SARS-CoV-2 PCR हा व्हेरियंट पकडण्यात सक्षम आहे. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत इतर अनेक देशही सतर्क झाले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी चाचणी करणं बंधनकारक असणार आहे. 


दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण 


ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. जगभरातील सर्वच देश ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकन देशांतून उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.


महाराष्ट्रही सतर्क 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत (omicron variant covid) दक्षता घेण्याच्या प्रशासन आणि आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 13 देशातून आलेल्या प्रवाशांना आता क्वारंटाईन अनिवार्य करण्यात येणार आहे.   त्यांचबरोबर या  देशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य असणार आहे. प्रत्येक आठ दिवसानंतर आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात येणार आहे. तसेच देशाअंतर्गतविमान प्रवास करणाऱ्याना देखील 48 तासांच्या आतील निगेटिव्ह प्रमाणपत्र अवश्यक असणार आहे. दरम्यान जुनकीय बदलाचे निरीक्षण करणाऱ्या लॅब वाढवण्याच्या सूचना देखील या बैठकीत करण्यात  आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :