नवी दिल्ली : देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध  टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्यानं सुरु होणार आहेत.


कर्फ्युची वेळ कमी करण्यात आली आहे. रात्री 9 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यु असणार आहे. शाळा, कॉलेज शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला आहे. सर्व बाबी पडताळून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.


कटेंनमेंट झोनच्या सीमा निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. लॉकडाऊन 5 ला 'अनलॉक 1' असं नाव देण्यात आलं आहे. कटेंनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.


पहिला टप्पा


- 8 जूननंतर धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु होणार. मात्र, यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालय जारी करणार आहे. त्यानंतरचं या गोष्टींना परवानगी मिळेल.
- 30 जूनपर्यंत रात्रीच्या वेळी कर्फ्यु लागू असणार.


दुसरा टप्पा


- शाळा कॉलेज सुरु करण्याबाबत जुलै महिन्यात निर्णय होणार.
- सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनवर बंदी.


तिसरा टप्पा


- परिस्थितीचा आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय विमान सेवा, मेट्रो, थिएटर, जीम, स्विमिंग पूल, बार सुरु करण्याबाबत निर्णय घेणार.


आंतरराज्य किंवा राज्यार्तंगत वाहतुकीवर बंदी नसणार आहे. मात्र वाहतूक नियंत्रित करण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, गरोदर महिला, आजारी व्यक्ती, लहान मुले यांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असणार आहे.


Unlock 0.1 देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला,अटी शर्तींसह धार्मिक स्थळ, हॉटेल्स सुरू करण्याची मुभा