Coronavirus New Varaint : कोरोनाचा (Corona) आलेख भारतात तेजीनं घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा (Covid-19) पॉझिटिव्हिटी दर घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. या घडामोडींमुळे जगभरातील सर्वच देश चीनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे धास्तावले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या नवा व्हेरियंट ओमायक्रॉन बीएफ.7 चा पहिला रुग्ण भारतात आढळून आला आहे. नवा ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron) इतर व्हेरियंट्सच्या तुलनेत फारच संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हेरियंटमध्ये अधिक ट्रान्समिशन क्षमता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 


चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव 


एकीकडे संपूर्ण जग कोरोनापासून सावरत आहे. तर दुसरीकडे चीनमध्ये पुन्हा कोरोना संकट पसरत आहे. चीन सरकारला अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. चीनमधील ज्या शहरांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्या सर्व शहरांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. 


भारतामध्ये 26 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण 


भारतात आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांच्या आकड्याबाबत बोलायचं झालं तर सध्या देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 26,834 इतकी झाली आहे. जे देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 0.06 टक्के आहे. तर देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.86 टक्के आहे. तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सोमवारी 1.02 टक्के होता. तर गेल्या 24 तासांत एकूण 2,060 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 


भारतानं लस खरेदी करण्यास दिला नकार 


केंद्र सरकारचा कोविड-19 लसीकरण कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहे. आणखी कोविड-19 लस खरेदी करणार नसल्याचा निर्णय भारतीय आरोग्य मंत्रालयानं दिला आहे. आरोग्य मंत्रालयानं सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. यासह, आरोग्य मंत्रालयानं लसीसाठी मिळालेल्या 5000 कोटी रुपयांपैकी 4,237 कोटी रुपये अर्थ मंत्रालयाला परत केले आहेत.