Coronavirus India Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दरम्यान, देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, मृतांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 62 हजार 224 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 2 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची स्थिती काय? 

देशातील आजची कोरोना स्थिती : 

एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 96 लाख 33 हजार 105एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 83 लाख 88 हजार 100 एकूण सक्रिय रुग्ण : 8 लाख 65 हजार 432एकूण मृत्यू : 3 लाख 79 हजार 573आतापर्यंतची एकूण लसीकरणाची आकडेवारी : 26 कोटी 19 लाख 72 हजार 14

दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 28,00,458 वॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर एकूण वॅक्सिनेशनचा आकडा 26,19,72,014 वर पोहोचला आहे. तसेच भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR) यांनी सांगितलं आहे की, भारतात काल कोरोना चाचणीसाठी 9,30,987 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत एकूण 38,33,06,971 सँपल टेस्ट करण्यात आले आहेत. 

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्यासाठी शिफारस केलीच नव्हती; वैज्ञानिकांचा दावा

काही दिवसांपूर्वी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर केंद्र सरकारकडून दुप्पट करण्यात आलं होतं. परंतु, आता यासंदर्भात तज्ज्ञांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलेलीच नव्हती, असा धक्कादायक दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे. दरम्यान, 13 मे रोजी केंद्र सरकारनं कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर सहा ते आठ आठवड्यांवरुन दुप्पट करुन ते 12 ते 16 आठवडे निश्चित केलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायजेशन म्हणजेच, 'एनटीएजीआय'मधील वैज्ञानिकांच्या शिफारशीनुसार, हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. पण दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्यासाठी आपला पाठिंबा नव्हता असा धक्कादायक खुलासा केंद्र सरकारच्या तज्ज्ञांच्या गटातील तीन सदस्यांनी केला आहे. 

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याचा हा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत होती. अशातच केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय नेमका कोणत्या तथ्यांच्या आधारावर घेण्यात आला, असे प्रश्नही उपस्थित केले जात होते. त्यावेळी आरोग्य मंत्रालयानं स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायजेशन म्हणजेच, 'एनटीएजीआय' यांच्या सल्ल्यानुसार, हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा निर्णय घेण्यामागे काही वैज्ञानिक आधार आहेत, असं देखील आरोग्यमंत्रालयानं स्पष्टीकरणात सांगितलं होतं.