Coronavirus india : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार देशात काही दिवसांपासून कहर करणाऱ्या कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नव्हे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्य़ात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर नियमांमध्ये सातत्यानं शिथिलता आणली तरीही देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असणार आहे, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 


गुरुवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 20 दिवसांपासून देशात कोरोना बाधितांची संख्या बऱ्याच अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. 


'24 राज्यांमध्ये मागील आठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट पाहायला मिळाली आहे. देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवलेली असताना मागील 3 आठवड्यांपासून पॉझिटीव्हीटी रेट मात्र कमी झाला आहे', असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. याच आधारे देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरण्यास सुरुवात झाली असून, नियमांमध्ये शिथिलता येत असतानाही हेच चित्र कायम राहणार असल्याचं आश्वासक वक्तव्य आरोग्य मंत्रालयानं केलं. 


Corona Vaccination : मुंबई महापालिकेच्या लसींच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून एका पुरवठादाराची माघार; पालिकेच्या अडचणीत भर


देशाला काहीसा दिलासा 


भारतात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. दरम्यान, आकड्यांवरुन कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे. परंतु, कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मागील, 24 तासांत 2 लाख 11 हजार 298 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3847 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 83 हजार 135 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच, काल सक्रिय रुग्णसंख्या 75,684 कमी झाली आहे. यापूर्वी मंगळवारी 208,921 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 4157 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


26 मेपर्यंत देशभरात 20 कोटी 26 लाख 95 हजार 874 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 18 लाख 85 हजार 805 लसीचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत 33 कोटी 70 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 22 लाख कोरोना चाचणीचे अहवाल तपासण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्क्यांहून अधिक आहे.