Coronavirus India : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोना वेग वाढलेला दिसत आहे. परिणामी केंद्राने राज्यांना सूचनाही पाठवल्या आहेत. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढल्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


कोरोनाचा विळखा वाढू लागल्यानंतर अनेक राज्यात मास्क वापरणे पुन्हा सक्तीचे करण्यात आले आहे. दिल्ली नोएडा, गाझियाबाद, पंजाब आणि हरियाणामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना आर्थिक दंड ठोठणावण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. अनेक ठिकाणी पुन्हा एकदा शाळा बंद कऱण्याचा निर्णय घेण्याता आला. त्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन वर्ग भरले आहेत. 


महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसत आहे. राज्यात सध्या मास्क सक्तीचा नाही. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहा महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडून लवकरच निर्बंध जाहीर केले जाऊ शकतात. मास्क वापरणे सक्तीचे केले जाऊ शकते. कोरोनाचा धोका टाळायचा असल्यास मास्क वापरणे अनिवार्य आहे. त्याशिवाय सोशल डिस्टन्सिंग आणि सतत हात धुणे गरजेचं आहे. काळजी घ्या अन् कोरोना टाळा...


भारतामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. तिसरी लाट ओसरल्यानंतर भारतामध्ये कोरोना नियमात शिथिलता आणली होती. पण आता पुन्हा एकदा चिंता वाढत आहे. नऊ राज्यातील 36 जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनानं विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंच्या आसपास आहे. म्हणजे, या 36 जिल्ह्यात जर 100 व्यक्तींची कोरोना चाचणी केली तर पाच जणांना कोरोना असल्याचं निदर्शनास येते. त्यामुळे या ठिकाणी कोरोना नियम अधिक कडक करण्यात येत आहे. 
 
आरोग्य विभागाच्या रिपोर्टनुसार सध्या देशात 14 हजारांपेक्षा जास्त सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.  उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यासह इतर राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी मास्क वापरावाच लागणार आहे. काही राज्यांनी मास्क अनिवार्यही केला आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबच्या काही शहरात मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मास्कशिवाय दिसणाऱ्यास आर्थिक दंडाला सामोरं जावं लागणार आहे.  योगी सरकारने लखनौसह सात जिल्ह्यात मास्क सक्तीचा केला आहे.  


 मास्क अनिवार्य करण्यासोबतच काही राज्यांनी गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. खासकरुन प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. याशिवाय काही शैक्षणिक संस्थांमध्येही कोरोना चाचण्या घ्या, असा आदेश देण्यात आलाय.  


दरम्यान, फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पुन्हा एकदा कोरोनानं हाहा:कार माजवला आहे. चीनसह इतर देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चीनमधील अनेक शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.