Sachin Pilot : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी आणि सचिन पायलट यांच्यात जवळपास दीड तास बैठक चालली. या बैठकीत राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. सध्या सचिन पायलट यांच्याकडे काँग्रेसचे कोणतेही जबाबदारीचे पद नाही. पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी निष्ठने पार पाडणार असल्याचे पायलट यांनी बैठकीनंतर सांगितले. 


सचिन पायलट यांनी गुरुवारी सोनिया गांधींची भेट घेतली. जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना आणि त्यामध्ये सचिन पायलट यांच्या जबाबदारीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर सचिन पायलट यांनी सांगितले की, राज्यात काँग्रेसची व्यूहरचना आणि निवडणुकीतील चेहऱ्याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना घ्यायचा आहे असे पायलट यांनी म्हटले. 


सचिन पायलट यांनी सांगितले की, राजस्थानमध्ये दर 5 वर्षांनी सत्ता बदल होत असतो. सत्ता बदलाचा हा ट्रेंड यंदा काँग्रेसला तोडायचा आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे. पायलट यांनी राज्यातील राजकीय घडामोडींबाबत सोनिया गांधींना माहिती दिली आहे. सचिन पायलट यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी राजस्थानसाठी काँग्रेसकडून एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर योग्य ती पावले उचलण्यात आली. या समितीच्या निर्णयानुसार, काम करावे लागणार असून 2023 मधील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एकत्रितपणे काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पक्षातंर्गत वादामुळे पंजाबमधील सत्ता गमावल्यानंतर आता काँग्रेसने राजस्थानमधील सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसने दमदार यश मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. यामध्ये काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांच्यासह तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांचीही मोठी भूमिका होती. मात्र, काही वर्षांपूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला होता.