मुंबई : सध्या राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशातच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेट कोरोना बाधितांच्या संख्येसह देशभरातील मृत्यूदरातही वाढ होत असल्याचं दिसत आहे. गेल्या चार आठवड्यांमध्ये मृत्यूदरात सरासरी 4.5 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीची 30 पथकं महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. 


सोमवारी देशात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याचं दिसून आलं. देशात एक लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली. परंतु, देशातील कोरोना बाधितांच्या आकड्यासोबतच मृत्यूदरातही विक्रमी वाढ होत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधितांची आकडेवरी वाढली तरी, कोरोमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक होती. अशातच आशादायी गोष्ट म्हणजे मृत्यूदर कमी होता. परंतु, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीमधून समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, देशातील मृत्यूदरात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. 


गेल्या काही दिवसांत नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येच्या दराप्रमाणे मृत्यूदरातही वाढ होतेय. गेल्या चार आठवड्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. 8 मार्च रोजी देशात कोरोनामुळे 96 जणांचा मृत्यू झाला होता. 4 एप्रिलला कोरोनामुळे दगावलेल्यांचा आकडा 425 इतका होता. याचाच अर्थ गेल्या चार आठवड्यात मृत्यूदरात सरासरी 4.5 टक्के इतकी वाढ झाली आहे. त्याआधीच्या चार आठवड्यांत कोरोना बाधितांची संख्या 50 टक्क्यांनी वाढत होती. मात्र मृत्यूदरात कोणतीही वाढ झाली नव्हती. याचाच अर्थ ज्या वेगाने कोरोना बाधितांची संख्या वाढतेय, त्याच वेगाने देशात मृत्यूदर वाढल्याने साऱ्यांची चिंता वाढली आहे. 


आतापर्यंत एक लाख 65 हजार रुग्णांचा मृत्यू


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता एक कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्याही वाढत असून ती आता सात लाख 41 हजार 830 इतकी झाली आहे. रविवारी 52,847 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता एक कोटी 16 लाख 82 हजार 136 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत एक लाख 65 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ 


देशातील सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे. राज्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काल (सोमवारी) महाराष्ट्रात 47 हजार 288 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 155 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 30 लाख 57 हजार 885 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर एकूण 56 हजार 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावेळी राज्यात 4 लाख 51 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच राज्यात रविवारी एका दिवसांत 57 हजार 74 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ होती. तर 222 रुग्णांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला होता. 


मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ 


देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. रविवारी मुंबईत एकाच दिवसांत तब्बल 9 हजार 857 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 3 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण 3 लाख 74 हजार 985 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सध्या 74 हजार 522 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :