Coronavirus Updates in India : जगभरात कोरोनाचा (Covid 19) वाढत संसर्ग पाहता नव्या वर्षातही कोरोनाचा धोका कायम आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, केंद्र सरकारकडून आवश्यक खबरदारीची पाऊले उचलण्यात येत आहेत. परदेशातून भारतात आलेले 53 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. भारतामध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रँडम कोविड (Random Covid Test) चाचणी केली जात आहे. त्याशिवाय प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य आहे. भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती दिलासादायक आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, पण खबरदारी घेणे आवश्यक आहे.
परदेशातून आलेले 53 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानसह अनेक देशांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे भारतात वेगाने उपाययोजना सुरू आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, विमानतळावर केल्या जात असलेल्या रँडम कोविड चाचणीमध्ये आतापर्यंत 53 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, हे प्रमाण 0.94 टक्के आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध विमानतळांवर दोन टक्के रँडम कोविड चाचणी करण्यात येत आहेत. यामध्ये एकूण 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 5 हजार 666 प्रवाशांचे नमुने गोळा करण्यात आले होते.
सुमारे 1,716 आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्या प्रवाशांचे निरीक्षण करण्यात आले.
रँडम कोविड चाचणी करण्याचे कारण काय?
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधअये सांगितले होते की, विमानतळावर दोन टक्के प्रवाशांची रँडम कोविड चाचणी केली जाईल. यानंतर राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी 24 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली. चीन, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकार ही पाऊले उचलत आहे.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताची तयारी
गेल्या काही आठवड्यांमध्ये चीन, अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. चीनमध्ये, कोविडच्या बहुतेक रुग्णांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सबव्हेरियंट BF.7 आढळला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांना 1 जानेवारी 2023 पासून कोविड निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केले आहे. प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी 72 तासांच्या आत कोविड चाचणी करावी लागेल.
देशात 3,653 सक्रिय कोरोना रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 226 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,653 वर पोहोचली आहे. देशात कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत एकूण 4,46,78,384 पॉझिटिव्ह आढळले आहेत. देशात सध्या कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या कमी आहे. पण नागरिकांनी योग्य खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.