XBB.1.16 Variant in India : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस (Coronavirus) हात-पाय पसरताना दिसत आहे. सध्या देशात XBB.1.16 व्हेरियंटचे (Corona New Variant) रुग्ण अधिक आढळत असल्याने वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचं कारण हा व्हेरियंटच असल्याचं मानलं जात आहे. भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) च्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या  (Covid-19) XBB.1.16 व्हेरियंटचे आतापर्यंत 610 रुग्ण आढळले आहेत. या व्हेरियंटचा 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात शिरकाव झाला आहे.


कोरोनाच्या नव्या XBB.1.16 व्हेरियंटचा धोका


देशात कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरियंटचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्यामध्ये आढळला होता. सध्या देशात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या मते, रुग्ण वाढीचं कारण XBB.1.16 व्हेरियंट आहे. INSACOG ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या XBB.1.16 व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सापडले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये XBB.1.16 व्हेरियंटचे प्रत्येकी 164 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर तेलंगणामध्ये 93 रुग्ण तर कर्नाटकमध्ये 86 रुग्ण आढळले आहेत. 


देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पुढे


देशातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 1805 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या पुढे पोहोचला आहे. सध्या देशात 10 हजार 300 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.


XBB 1.16 व्हेरियंटने चिंता वाढवली


देशात सध्या कोरोना व्हायरसच्या नव्या XBB 1.16 व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. जगासह देशातही कोविड व्हायरस संसर्ग अजूनही सुरुच आहे. कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे. देशात आतापर्यंत 4,41,64,815 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. 






गेल्या 24 तासांत सहा जणांचा मृत्यू


आरोग्या मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10,300 झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोना संसर्गामुळे देशात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. चंदीगड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका संक्रमित व्यक्तीचा मृत्यू झाला. तर केरळमध्ये संसर्गामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 5,30,837 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4.47 कोटींच्या वर पोहोचली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Coronavirus : धोका वाढला! कोरोनापासून बचावासाठी चतुःसूत्री; 'या' चार T चा अवलंब करा, आरोग्य मंत्रालयाच्या सूचना