Coronavirus Cases Today : जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दरम्यान, सध्या देशात मात्र कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 8 हजार 488 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर देशात 24 तासांत 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, देशात 538 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 18 हजार 443 आहे. जाणून घेऊया कोरोनाची ताजी आकडेवारी... 


आतापर्यंत 4 लाख 65 हजार 911 मृत्यू 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल (रविवारी) 24 तासांत कोरोनाच्या 12 हजार 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या महामारीमध्ये जीव गमावलेल्यांचा आतापर्यंतचा एकूण आकडा 4 लाख 65 हजार 911 वर पोहोचला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 34 हजार 547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 






महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 845 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


महाराष्ट्रात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात काल (रविवार, 21 नोव्हेंबर) 845 नव्या कोरोनाबाधित आढळून आले. तर, 17 जणांच्या मृत्युची नोंद झालीय. याशिवाय, 730 रुग्णांनी काल कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्र कोरोनामुक्तच्या दिशेनं वाटचाल करीत असल्याचं या आकड्यातून स्पष्ट होतं आहे. राज्यात सध्या एकूण 9 हजार 799 रुग्ण सक्रीय आहेत. राज्यातील नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक माहिती आहे. 


महाराष्ट्राला कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यास मोठं यश आलं आहे. या काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईन वर्कर्सनं मोलाचा वाटा उचलला आहे. ज्यामुळं राज्यातील रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होऊ लागलीय. राज्यात काल 845 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 17 रुग्णांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आजपर्यंत 6 कोटी 46 लाख 87 हजार 403 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 66 लाख 29 हजार 875 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. राज्यात सध्या 97 हजार 482 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर, 1 हजार 19 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. 


मुंबईत सध्या 2 हजार 577 सक्रिय रुग्ण


मुंबईत गेल्या 24 तासांत 213 नवे रुग्ण आढळून आले. तर, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 281 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. मुंबईतील कोरोनामुक्तांची एकूण संख्या 7 लाख 39 हजार 707 वर पोहचलीय. महत्वाचं म्हणजे, बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या 2 हजार 577 रुग्ण सक्रीय आहेत. तसेच रुग्ण दुप्पटीचा दर 2 हजार 403 दिवसांवर पोहचला आहे.