Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव सुरुच आहे. चिंतेची बाब म्हणजे, देशात सध्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 7 हजार 447 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या 88 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जाणून घेऊया कोरोनाची सध्याची स्थिती... 


आतापर्यंत 4 लाख 76 हजार 869 रुग्णांचा मृत्यू 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 86 हजार 415 आहे. या महामारीमध्ये जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 76 हजार 869 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (गुरुवारी) 7886 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 62 हजार 765 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 







आतापर्यंत 135 कोटींहून अधिक लसीचे डोस दिले गेले 


राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीचे 135 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहे. काल (गुरुवारी) 70 लाख 46 हजार 805 डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत लसीच्या 135 कोटी 99 लाख 96 हजार 267 डोस देण्यात आले आहेत. 


देशात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 88 रुग्णांची नोंद 


गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 88 वर पोहोचली आहे. सध्या ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनचे 32 रुग्ण आहेत, तर राजस्थानमध्ये 17, दिल्लीत 10, केरळात 5, गुजरातमध्ये 5, कर्नाटकात 8, तेलंगणात 7, पश्चिम बंगालमध्ये 1, आंध्र प्रदेश 1, तामिळनाडूत 1 आणि चंदिगढमध्ये 1 रुग्ण आढळून आले आहेत. 


ब्रिटनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद


ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. सलग दुसऱ्या दिवशी ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद करण्यात आली. गुरुवारी ब्रिटनमध्ये 88 हजार 376 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. मागील 28 दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये कोरोनाबाधित असलेल्या 165 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महासाथीची सुरुवात झाल्यानंतर ब्रिटनमध्ये दुसऱ्यांदा बाधितांची उच्चांकी नोंद करण्यात आली. ब्रिटनमध्ये बुधवारी 78 हजार 610 बाधितांची नोंद करण्यात आली होती. याआधी 8 जानेवारी रोजी 68 हजार 053 बाधितांची नोंद करण्यात आली. त्यावेळी ब्रिटनमध्ये लॉकडाउन सुरु होता. जानेवारीत नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा ही संख्या 10 हजाराने अधिक आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ब्रिटनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद, 88 हजार बाधित आढळले, ओमायक्रॉनचा धोका!


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह'