Coronavirus Cases Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या (COVID-19) प्रादुर्भावात घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज देशात 24 तासांत 18 हजार 454 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच काल दिवसभरात देशात 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4 लाख 52 हजार 811 वर पोहोचला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आज देशात कोरोना लसीकरणानं नवा विक्रम रचला आहे. देशानं 100 कोटी लसींच्या डोसचा आकडा पूर्ण केला आहे. जाणून घेऊया देशातील कोरोनाची एकूण आकडेवारी...
देशातील कोरोना स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 78 हजार 831 सक्रिय कोरोनाबाधित आहेत. काल दिवसभरात उपचारानंतर 17 हजार 561 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे तीन कोटी 34 लाख 95 हजार 808 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाच्या तीन कोटी 41 लाख 27 हजार 450 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती.
ऐतिहासिक विक्रमी! देशात लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता. त्यावेळी संपूर्ण देशाचं लसीकरण करायला अनेक वर्षे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळेल का नाही अशीही शंका व्यक्त केली जात होती. पण या सर्वावर मात करत देशाने कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि देशवासियांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट साध्य झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
Corona vaccination : ऐतिहासिक...विक्रमी...! देशात लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला
देशात कोरोनाच्या लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज 100 कोटी डोस पूर्ण झाले. लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.
महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांसह 23 मनपा क्षेत्रांमध्ये काल कोरोनामुळं एकही मृत्यू नाही
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असल्याचं दिसत आहे. काल बुधवारी महाराष्ट्रातील तब्बल 27 जिल्हे आणि 23 महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोनामुळं एकही मृत्यू झाला नसल्याचं सरकारी आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. मुंबई उपनगरातील ठाणे जिल्ह्यासह सात उपनगरांमध्ये एकही मृत्यू झालेला नाही. तर नाशिक मंडळातील अहमदनगर जिल्ह्यात दोन आणि नाशिक शहरात दोन मृत्यू वगळता इतर जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. विदर्भातील एकाही जिल्ह्यात काल कोरोनामुळं कुणालाही जीव गमावावा लागलेला नाही. राज्यात काल 1825 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल एकूण 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक 4 मृत्यू हे सातारा जिल्ह्यात झाले असल्याची नोंद आहे.