Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यासोबतच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron)ची लागण झालेल्यां रुग्णांमध्येही वेगानं वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 6 हजार 531 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 578 रुग्ण आढळून आले आहेत. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सद्यस्थिती... 


आतापर्यंत 4 लाख 79 हजार 997 रुग्णांचा मृत्यू 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 75 हजार 841 वर पोहोचली आहे. अशातच महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 79 हजार 997 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, उद्या 7141 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 37 हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 





आतापर्यंत 141 कोटींहून अधिक लसीचे डोस 


राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधक लसीचे 141 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल 29 लाख 93 हजार 283 डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देण्यात आलेल्या लसीच्या डोसचा आकडा 141 कोटी 70 लाख 25 हजार 654 वर पोहोचला आहे. 


ओमायक्रॉन फोफावतोय; देशातील 19 राज्यांत 578 रुग्ण


देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) घातक व्हेरियंट ओमायक्रॉननं (Omicron Variant) धाकधुक वाढवली आहे. देशात आतापर्यंत या व्हेरियंटमुळं 19 राज्यात 578 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, या व्हेरियंटमुळं 151 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. 


कॉकटेल स्वरुपात मिळणार बुस्टर डोस? 


पंतप्रधान मोदींनी 10 जानेवारीपासून भारतात बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तेव्हापासूनच बुस्टर डोसबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. बुस्टर डोस किती दिला जाणार? कोणत्या लसीचा दिला जाणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. पण लस देताना सरकार एक खास प्लान राबवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला लसीचे पहिले दोन डोस एका वॅक्सिनचे देण्यात आले असतील तर तिसरा म्हणजेच, बुस्टर डोस त्याच वॅक्सिनचा देण्यात येणार नाही. तो दुसऱ्या वॅक्सिनचा देण्यात येणार आहे किंवा त्यासाठी कॉकटेल लशीच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा