Coronavirus Cases Today in India : कोरोना संसर्गाचा धोका कायम असून पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या 12 हजार 249 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. सोमवारी देशात 9923 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 17 रुग्णांचा मृत्यू झाला. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख पाहायला मिळत आहे.
देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचा दर वाढून 3.94 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवी आकडेवारी जारी केली आहे. यानुसार मागील 24 तासांत 9 हजार 862 हजार रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. मंगळवारी दिवसभरात झालेल्या 13 रुग्णांच्या मृत्यूमुळे देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची एकूण संख्या 5 लाख 24 हजार 903 वर पोहोचली आहे.
प्रशासनाची चिंता वाढली
देशातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आता पावसाळाही सुरु झाल्यामुळे इतर आजारही बळावण्याची शक्यता आहे.
ओमायक्रॉनचा संसर्ग कायम
मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या उपप्रकाराचा संसर्ग कायम असल्याचं दिसत आहे. जीनोम सिक्वेन्सिंगचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितलं, 'जीनोम सिक्वेन्सिंग केलेल्या नमुन्यांमध्ये आम्ही ओमायक्रॉनचे उपप्रकार BA.4 आणि BA.5 हे सापडले आहेत. पण या रुग्णांची संख्या अजूनही कमी आहे.'
महाराष्ट्रात 3659 नव्या रुग्णांची भर
राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज 3659 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे 1751 रुग्णांची भर पडली आहे.
मुंबई, दिल्लीत रुग्णसंख्या वाढतीच
दिल्लीत कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 7.22 टक्के झाला आहे. दिल्लीत 1 हजापर 383 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईत मंगळवारी 1 हजार 781 नवीन कोरोनाबाधित आणि एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: