Coronavirus Cases Today in India : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावात घट झाली आहे. देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2 हजार 539 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) 2 हजार 876 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 98 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
देशातील कोरोना व्हायरसची सद्यस्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2 हजार 539 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 30 हजार 799 वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 24 लाख 54 हजार 546 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत 180 कोटींहून अधिक लसीचे डोस
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 180 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (बुधवारी) 17 लाख 86 हजार 478 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत लसीचे 180 कोटी 80 लाख 24 हजार 157 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं. त्याच वेळी, कोरोना योद्धांसाठी लसीकरण मोहीम 2 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे.
मुंबईत 44 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईतील कोरोना रुग्णांच्या (Mumbai Corona Update) संख्येत आजही घट झाली आहे. काल नवे 44 रुग्ण आढळले असून कालपेक्षा 6 कमी रुग्ण समोर आले आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एका मृत्यूची नोंद देखील झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत नवे 44 कोरोनाबाधित आढळले असून 53 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली असून काल ही संख्या 314 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 44 रुग्णांपैकी 7 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 387 बेड्सपैकी केवळ 90 बेड सध्या वापरात आहेत.