Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 547 कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट होण्यासोबत दुसरी दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 547 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 46 लाख 66 हजार 924 जणांना कोरोनाची लागण झाली. यामधील चार कोटीहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.


देशात 9 हजार 468 सक्रिय रुग्ण


देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांच्या खाली पोहोचली आहे. सध्या देशात 9 हजार 468 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात अनेक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना बळींची संख्या 5 लाख 30 हजार 532 वर पोहोचली.  देशात 219 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे






कोरोना विषाणूमुळे हृदयाचे नुकसान कसे होते?


कोरोना पसरवणाऱ्या कोविड-19 (Covid-19) म्हणजे SARS-CoV-2 विषाणूबद्दल संशोधकांनी एक नवीन खुलासा केला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमध्ये झालेल्या कोरोना विषाणूवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोना विषाणूमुळे हृदयाचे नुकसान होते. कोरोना विषाणू कोरोनाबाधित लोकांच्या हृदयाच्या स्नायूंना नुकसान पोहोचवतो. SARS-CoV-2 विषाणू हृदयाला कसे नुकसान पोहोचवतो यामागील कारण शास्त्रज्ञांनी शोधले आहे. एका अभ्यासानुसार, कोविड-19 ग्रस्त लोकांमध्ये हृदयाच्या स्नायूंना सूज येणे, हृदयाचे असामान्य ठोके, रक्ताच्या गुठळ्या होणे, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि संक्रमणानंतर किमान एक वर्ष हृदयाची गती कमी होण्याचा धोका जास्त असतो.






कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता, WHO कडून धोक्याचा इशारा


शास्त्रज्ञांनी पुन्हा कोरोनाच्या नवीन लाटेचा (Corona Wave) धोका व्यक्त केला आहे. ओमायक्रॉनचा (Omicron) नवीन XBB व्हेरियंटमुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. जगभरात हा व्हेरियंट वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) नव्या व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहेत.