Coronavirus Cases Today in India : जगभरासह भारतातही कोरोनाचा धोका कायम आहे. देशात कोरोनाचा संसर्ग किचिंत घटताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात आज 347 नवीन कोरोनाबाधित सापडले असून गेल्या 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळए मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोनाचं उगम स्थान समजलं जाणाऱ्या चीनने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये गेल्या 24 तासांत 32,943 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच्या तुलनेनं भारतात कोरोना संसर्गात सातत्यानं घट होताना पाहायला मिळत आहे.
देशात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. देशात सध्या 5 हजार 516 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. ही संख्या 5 हजार 881 इतकी होती. गेल्या 24 तासांत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 30 हजार 604 वर पोहोचला आहे. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 70 हजार 830 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन
चीनमध्ये अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. चीनमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चीन प्रशासनाने पुन्हा एकदा झिरो कोविड धोरणाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चीनमध्ये गुरुवारी दिवसभरात 32,943 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. बुधवारी चीनमध्ये 31,454 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, यामध्ये 27,517 रुग्णांमध्ये लक्षणे नव्हती.
कोरोना विषाणूचा मेंदूवर परिणाम
दरम्यान, एकीकडे कोरोनाचा धोका कायम आहे, तर दुसरीकडे कोरोना विषाणूबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये मेंदू संबंधित समस्या असल्याचं समोर आलं आहे. एका संशोधनानुसार, कोरोनाचा विषाणू मेंदूवर परिणाम करतो यामुळे रुग्णांमध्ये नैराश्य आणि तणाव अशा समस्या दिसून येत आहेत.