Coronavirus Cases Today in India : कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे. कारण कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज कमालीची घट होत आहे. गेल्या 24 तासात देशात 5 हजार 921 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 289 जणांचा गेल्या 24 तासात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. काल देशात 6 हजार 396 रुग्णांची नोंद झाली होती. तर 201 जणांचा कोरोनामुले काल मृत्यू झाला होता.


सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट


रुग्ण संख्येत दररोज घट होताना दिसत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल देशात 13 हजार 450 लोक कोरोनातून बरे झाले होते. त्यानंतर आता सक्रिय रुग्णांची संख्या 63 हजार 878 वर आली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे आत्तापर्यंत देशात 5 लाख 14 हजार 878 जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 23 लाख 78 हजार 731 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.


 


आतापर्यंत सुमारे 178 कोटी लसींचे डोस


सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु आहे. ज्यांनी लसीकरण केलेले नाही अशांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 178 कोटी अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 24 लाख 62 हजारांहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 178 कोटी 55 लाख 66 हजार 940 लसींचे डोस देण्यात आले आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.





12-17 वर्षांच्या मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी कोवोव्हॅक्सची शिफारस 


दरम्यान, देशाच्या केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ समितीने 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (SII) अँटी-कोविड लस कोवोव्हॅक्सला परवानगी मिळावी यासाठी शिफारस केली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 28 डिसेंबर रोजी प्रौढांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापरासाठी Kovovax ला मान्यता दिली. देशाच्या लसीकरण मोहिमेत अद्याप त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. SII मधील सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी 21 फेब्रुवारी रोजी DCGI कडे 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवोव्हॅक्ससाठी EUA मागणारा अर्ज सादर केला होता.


महत्त्वाच्या बातम्या: