Coronavirus India Cases : देशात 44 दिवसांनी कोरोनाबाधितांची सर्वात कमी संख्या नोंदवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकेडवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 86 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3660 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 2 लाख 59 हजार 459 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी काल दिवसभरात 76,755 रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 211,298 लाख नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 3847 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


27 मेपर्यंत देशभरात 20 कोटी 46 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर काल दिवसभरात 18 लाख 85 हजार 805 लसीचे डोस देण्यात आले. तसेच आतापर्यंत 33 कोटी 90 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या. काल दिवसभरात 20.70 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याच्या पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्के आहे. 


भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात


केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात काही दिवसांपासून कहर करणाऱ्या कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नव्हे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्य़ात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर नियमांमध्ये सातत्यानं शिथिलता आणली तरीही देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असणार आहे, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 


गुरुवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 20 दिवसांपासून देशात कोरोना बाधितांची संख्या बऱ्याच अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. 


'24 राज्यांमध्ये मागील आठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट पाहायला मिळाली आहे. देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवलेली असताना मागील 3 आठवड्यांपासून पॉझिटीव्हीटी रेट मात्र कमी झाला आहे', असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. याच आधारे देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरण्यास सुरुवात झाली असून, नियमांमध्ये शिथिलता येत असतानाही हेच चित्र कायम राहणार असल्याचं आश्वासक वक्तव्य आरोग्य मंत्रालयानं केलं. 


राज्यात गुरुवारी 34,370 डिस्चार्ज तर 21,273 नवीन कोरोनाबाधित, रिकव्हरी रेट 93.02 टक्क्यांवर


राज्यात आज तर 21,273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 34,370 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 425 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 3,01,041 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


आजपर्यंत एकूण 52,76,203 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.02 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 425 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.63 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,40,86,110 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,72,180 (16.64 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 22,18,278  व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,996  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Coronavirus india : भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात; जाणून घ्या केव्हापर्यंत राहील अशीच परिस्थिती