Coronavirus Cases Today in India : देशात सलग दोन दिवस वाढणारा कोरोना (Covid19) रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा एकदा घसरला आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये देशातील कोरोना संसर्गामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, भारतात शुक्रवारी दिवसभरात 13 हजार 272 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्येत आदल्या दिवसाच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. देशात गुरुवारी 15 हजार 754 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 2,482 रुग्ण घटले. देशात गेल्या 24 तासांत 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामागील एक सकारात्मक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13 हजारांहून अधिक आहे. 


देशात एकूण चार लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त


देशात नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या 24 तासांत 13 हजार 900 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्या आतापर्यंत भारतात 4 कोटी 36 लाख 99 हजार 435 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. शुक्रवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 13 लाख 15 हजार 536 डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेत 19 ऑगस्ट 2022 पर्यंत 209 कोटींकडून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. 




मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या हजार पार


मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 1011 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 869 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,11,167 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.8 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


महाराष्ट्रात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू


आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात मागील 24 तासांत 2285 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात एकूण 2237 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,20, 772 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे.