India Coronavirus Cases: देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) दैनंदिन आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 5 हजार 335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कालच्या तुलनेत आजचा आकडा तब्बल 20 टक्क्यांनी अधिक आहे. 


आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत नोंदवण्यात आलेला नव्या कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या 6 महिन्यांतील सर्वाधिक आकडा आहे. देशात काल दिवसभरात 5335 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 25 हजार 587 वर पोहोचली आहे. देशात सध्या दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात सध्या सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचं पाहायला मिळत आहे. 






'या' राज्यांमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकमध्ये दोन, महाराष्ट्रात 2, पंजाबमध्ये एक, केरळमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात दैनिक सकारात्मकता दर 3.32 टक्के आहे. तसेच, गेल्या 24 तासांत 2826 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या कालावधीत 1993 लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला आहे.


कोरोनाबाधितांचा एकुण आकडा... 


देशातील कोरोनाबाधितांचा बुधवारचा आकडा पाहिला तर, देशात 4 हजार 435 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सध्या देशातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची आकडेवारी 4 कोटी 47 लाख 33 हजार 719 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, भारतात लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 220.66 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. 


महाराष्ट्रात किंचित घट 


महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 569 जण पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, एका दिवसापूर्वी राज्यात 711 जण पॉझिटिव्ह आले होते. आता राज्यातील कोविड-19 चे एकूण रुग्णसंख्या 81,46,870 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 1,48,451 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मुंबईत आहे. गेल्या 24 तासांत येथे 211 नवे रुग्ण आणि एक मृत्यू नोंदवला गेला, तर दुसरा मृत्यू पुण्यात झाला. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा मृत्यू दर 1.82 टक्के आहे. 


घाबरू नका, खबरदारी बाळगा


कोरोनाता वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


देशात कोरोनानं धरला वेग; राजधानीत एका दिवसांत पॉझिटिव्ह दर 10.9 टक्क्यांनी वाढला, तर महाराष्ट्रात दोघांचा मृत्यू