Ghulam Nabi Azad on PM Modi: काही वर्षांपूर्वी मोदींवर (PM Modi) टीकेची झोड उठवणारेच आता पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्यांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे काँग्रेसपेक्षा जास्त उदारमतवादी असल्याचं त्यांचं मत आहे. यासोबतच काँग्रेस अनेक दशके सत्तेवर येणार नाही, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी मोदींवर कौतुकाची स्तुतीसुमनं उधळली. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी गेल्या वर्षीच काँग्रेसपासून फारकत घेतली आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. 


एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आझाद म्हणाले की, मी कधीही पीएम मोदींच्या डिनर पार्टीला गेलो नाही, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. विरोधी पक्षनेते म्हणून गेल्या सात वर्षात मी त्यांच्या विरोधात 70 वर्षांच्या बरोबरीची भाषणं दिली, पण त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं. ते नेहमीच राजकारणी म्हणून दिसले. आयुष्यात असे प्रसंग येतात, जेव्हा एखाद्याला राजकारण्यासारखं वागावं लागतं. यावेळी भाजपचे दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख गुलाम नबी यांनी केला आणि तेही खरे राजकारणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


संजय गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांचा किस्सा आझाद यांनी सांगितला 


यादरम्यान गुलाम नबी आझाद यांनी संजय गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा एक किस्साही शेअर केला. गुलाम नबी म्हणाले की, "ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा अर्थसंकल्पीय भाषणात संजय गांधी बोलण्यासाठी संसदेत उभे राहिले. त्यांनी 15 मिनिटांचं भाषण केलं आणि त्या संपूर्ण भाषणात अटलबिहारी वाजपेयींच्या विरोधात सर्व काही सांगितलं. त्यानंतर अटलबिहारी यांची बोलण्याची वेळ आली, पण त्यांनी आपण संजय गांधी यांच्या विरोधात काहीही बोलणार नसल्याचं सांगितलं."


त्याचबरोबर गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनंही प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुलाम नबी आझाद तसेच यापूर्वी काँग्रेसचे सदस्य असलेले भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, दोन्ही नेत्यांनी आता त्यांचे खरे चरित्र दाखवून दिले आहे, जे ते बऱ्याच काळापासून लपवून ठेवत होते. यासोबतच या दोन्ही नेत्यांना काँग्रेसमध्ये असताना मोठा फायदा झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पण आता हे लोक त्यासाठी लायक नसल्याचं दाखला स्वतःच देत आहेत.