नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा हवेतून संसर्ग होऊ शकतो. कोरोनाबाधित रुग्ण खोकल्यास किंवा शिंकल्यास विषाणूचा हवेतून प्रसार होईल. त्यासाठी मास्कच प्रभावी आहे, अशी माहिती सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली. तसंच वॉल्व्ह असलेले मास्क धोकादायक असून ते न वापरण्याचा सल्लाही डॉ. शेखर मांडे यांनी दिला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला.


हवेतून संसर्ग होतो का?
हवेतून कोरोनाचा संसर्ग होतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. शिवाय डॉ. शेखर मांडे यांनीही हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचं आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहेत. याविषयी डॉ. मांडे म्हणाले की, " आपण जेव्हा बोलतो, शिंकलो किंव खोकलो तर आपल्या नाका-तोंडातून काही कण बाहेर पडतात. कोरोनाबाधित बोललताना, खोकताना किंवा शिंकताना त्याच्या नाका-तोंडातून बाहेर पडलेले कण हवेत तरंगतात. हे कण इतरांच्या नाका-तोंडात गेले तर त्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे खोल्या बंद नसाव्यात, अंतर ठेवावं. यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे मास्कचा वापर करावा. कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क हे प्रभावी शस्त्र आहे."

कोरोनावरची लस कधी येणार?
सप्टेंबर महिन्यात कोरोनावरील लस येईल, असं वृत्त होतं. याविषयी डॉ. शेखर मांडे म्हणाले की, "लसीची प्रक्रिया मोठी आहे. त्यासाठी बराच वेळ लागतो. जगभरात यावर काम सुरु आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये अमेरिकेतील मॉडर्ना, ऑक्सफर्डची लस, चीनमधील लसीची चाचणी अॅडव्हान स्टेजमध्ये आहे. मात्र डिसेंबर-जानेवारीपर्यंत लसीची वाट पाहावीच लागणार आहे. जगात लस कुठेही बनली तरी भारतीय कंपन्या त्या आपल्याला उपलब्ध करुन देतील."

वॉल्व्ह असलेले मास्क वापरावेत की नाही?
वॉल्व्ह असलेले मास्क वापरावेत की नाही? यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. याबाबत डॉ. शेखर मांडे यांनी सांगितलं की, "वॉल्व्ह घातलेला व्यक्ती संरक्षित असतो. पण इतर लोकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जर कोरोनाबाधिताने वॉल्व्ह असलेला मास्क घातला असेल तर त्याच्या श्वासातून विषाणू बाहेर पडू शकतात. त्यामुळे वॉल्व्ह असलेला मास्क वापरु नये असं म्हणतात. डॉक्टरांनी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी एन95 मास्क वापरले तरी चालतील. पण सामन्यांनी तीन-चार थर असलेले मास्क वापरणं उत्तम आहे."

कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड झालाय?
कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड अर्थात समूह संसर्ग झालाय की नाही हे आपल्याला आरोग्य विभागच सांगू शकेल, असं डॉ. शेखर मांडे म्हणाले. "लॉकडाऊनचा फायदा खूप झाला. अमेरिका, ब्राझील, रशियामध्ये ज्या वेगाने कोरोनाचा संसर्ग झाला, तेवढा आपल्या लॉकडाऊनमुळे भारतात झाला नाही. लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे संसर्ग वाढणार हे निश्चितच होतं. लोकांनी नियम पाळले तर कोरोना आणखी वाढणार नाही," असं मांडे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

Covid 19 Vaccine: गुड न्यूज! ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वी

'देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, स्थिती बिघडली' : इंडियन मेडिकल असोशिएशन


Coronavirus | कोरोना विषाणूचा हवेतून संसर्ग, मास्क प्रभावी शस्त्र : डॉ. शेखर मांडे