नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीत पंतप्रधान मोदींनी देशाला एका नव्या उत्सवाचं आवाहन केलंय. हा उत्सव आहे टीका उत्सव...म्हणजे लसीकरणाचा उत्सव...आता ज्या राज्यांना मुळात लसच पुरेशा प्रमाणात मिळत नाहीय. त्यांनी हा उत्सव कशाच्या जोरावर करायचा हा मात्र प्रश्नच आहे.   


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झगडणाऱ्या राज्यांना पंतप्रधान मोदींनी एक नवा मंत्र दिला. टीका उत्सव... म्हणजे लसीकरणाचा उत्सव साजरा करा असं मोदी म्हणत आहेत..11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे तर 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती...याच निमित्तानं 11 एप्रिल ते 14 एप्रिल असा चार दिवसांचा हा लसीकरण उत्सव साजरा करा असं मोदींचं राज्यांना सांगणं आहे. 
 
काल सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. देशात ज्यावेळी कोरोनाची दुसरी लाट भयानक वेगानं वाढतेय, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत होती..


राज्यांसमोर मुख्य समस्या आहे ती लस तुटवड्याची..राज्याला पुरेशी लस मिळत नाहीय असं महाविकास आघाडीचे नेते म्हणतायत...तर त्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अगदी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, जावडेकर हे मात्र हा केवळ बहाणा असल्याचं सांगत आहेत...कालच्या बैठकीत या लस पुरवठ्याबाबतचं काही ठोस धोरण ठरेल असं वाटत होतं, मात्र एकाच राज्याला लस देऊन कोरोना संपणार नाही असं म्हणत मोदींनी या विषयाला बगल दिली. 


कोरोनाच्या काळातही मोदींनी देशातल्या जनतेला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये दंग केलं होतं...लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच थाळीनाद, घंटानाद यासारखे उपक्रम करुन झाले...आता लसीचा हा महोत्सव...पण यावरुन काँग्रेस नेत्यांनी मात्र जोरदार टीका केलीय. 


कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेसाठी कडक लॉकडाऊनची गरज नाही, त्याऐवजी कंटेनमेंट झोन अधिक निगराणीनं करण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी बोलून दाखवली. नाईट कर्फ्युला कोरोना कर्फ्यु असं नाव द्या, जेणेकरून लोकांमध्ये त्याचा योग्य संदेश जाईल..एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याचे किमान 30 कॉन्टॅक्ट ट्रेस झाले पाहिजेत अशीही सूचना मोदींनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केलीय. 


लसीकरणाच्या इतिहासात भारताकडे फार मोठा अनुभव गाठीशी आहे, पण तरीही गेल्या 3 महिन्यांत केवळ 1 टक्के नागरिकांचंच लसीकरण पूर्ण का असा सवाल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारलाय...गरजेपेक्षा जास्त लस आपण का निर्यात केली...इतर लसींची परवानगी लांबणीवर का आहे हे देखील प्रश्न आहेतच..जोपर्यंत या सगळ्यावर उत्तर मिळत नाही तोपर्यंत केवळ उत्सवाचं नाव देऊन लसीकरण पूर्ण होणार नाहीय.