चंदीगड : अमेरिकेची औषध कंपनी मॉडर्नानं (VACCINE MANUFACTURER MODERNA) राज्यांना सरळ लस देण्यास नकार दिला आहे. कोरोना वॅक्सिन सरळ राज्याला पाठवण्याबाबतच्या पंजाब (PUNJAB) सरकारचा प्रस्ताव मॉडर्ना कंपनीनं फेटाळला आहे. पंजाबचे वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि कोविड वॅक्सिनेशन (Covid Vaccination) चे नोडल अधिकारी विकास गर्ग यांनी ही माहिती रविवारी दिली. 


अमेरिकन औषध कंपनी मॉडर्नानं पंजाब सरकारला स्पष्टपणे सांगितलं आहे की, ते केवळ भारत सरकारसोबत व्यवहार करतील. अमेरिकेच्या प्रसिद्ध असलेल्या मॉडर्ना या कोविड लस निर्मिती कंपनीकडून हा निर्णय अशा वेळी घेतला आहे ज्यावेळी राज्य सरकारांकडून लसीकरणासाठी दुसऱ्या देशांकडून लसींच्या मागणीसाठी संपर्क साधला जात आहे. 


देशातील काही राज्यांनी कोरोनावरील लस मिळावी यासाठी ग्लोबल टेंडर देखील काढले आहेत. केंद्र सरकारकडून 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या वयोगटाच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर सोपवली आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याने राज्यांना लसीसाठी झुंजावे लागत आहे.  


भारतात सध्या दोन कंपन्या लसींची निर्मिती करत आहेत. यात सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया कोविशील्ड आणि भारत बायोटेक कोवॅक्सिनची निर्मिती करत आहेत. भारतात लसींचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रशियाच्या स्पुटनिक लसीच्या देखील आपत्कालीन उपयोगाला मंजूरी देण्यात आलेली आहे. मात्र तरीही देशात लसींचा तुडवडा मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक ठिकाणी लसींच्या तुटवड्यामुळं 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण देखील काही ठिकाणी थांबवण्यात आलं आहे. 


अमेरिकेच्या एफडीएने मॉडर्ना लसीच्या वापरासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. ही लस सुरक्षित असून 94.2 टक्के प्रभावी असल्याचे एफडीएने सांगितले आहे.