नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लॉकडाऊन आणखी एक आठवड्याने वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा आज केली. दिल्लीत 31 मे सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू असणार आहे. दिल्लीत 19 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये वाढ करुन 24 मेपर्यंत लॉकडाऊन दिल्लीत लागू होता. मात्र आता दिल्ली सरकारने लॉकडाऊन एक आठवड्याने वाढवला आहे. 


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की,  सध्याचा लॉकडाऊन उद्या पहाटे पाच वाजता संपत आहे. आज पुन्हा आपल्या सर्वांना, दिल्लीतील जनतेला लॉकडाऊन वाढवायचे की नाही हे ठरवायचे आहे. एप्रिल महिन्यात जेव्हा संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा लॉकडाऊन लागू करणारं दिल्ली देशातील पहिले राज्य होतं. तेव्हा परिस्थिती गंभीर होती, कोरोनाच्या लाटेचा सामना कसा करु हे सांगता येत नव्हतं. परंतु एका महिन्यात दिल्लीतील लोकांच्या शिस्त व संघर्षामुळे कोरोनाची ही लाट ओसरताना दिसत आहे. मी असं म्हणणार नाही की आपण युद्ध जिंकलं आहे, परंतु आपण यावर नियंत्रण मिळवलं आहे, असं केजरीवाल यांनी सांगितलं. 


दिल्लीतील कोरोनाच्या आकडेवारीचा संदर्भ देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, एप्रिलमध्ये एक दिवस असा होता की पॉझिटिव्हिटी रेट 36 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. म्हणजेच 100 लोकांची चाचणी घेतल्यानंतर 36 लोक बाधित आढळत होते. मात्र गेल्या 24 तासात हाच पॉझिटिव्हिटी रेट 2.5 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. एप्रिल महिन्यात एका दिवसात 28 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत होती. गेल्या 24 तासांत 1600 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाविरोधातील युद्ध अद्याप शिल्लक आहे. 


केसेस कमी झाल्यास अनलॉक सुरु करू - केजरीवाल


लॉकडाऊनबाबत आम्ही अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यावर एक आठवड्यासाठी अधिक लॉकडाऊन वाढवला जावा असं उत्तर मिळालं. कारण जर आपण लॉकडाउन हटवला तर असं होऊ नये की आपण मागील 1 महिन्यात जे काही केलं ते पूर्ण वाया जावं. म्हणूनच दिल्लीत सोमवार 31 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत आहे. जर अशा प्रकारे कोरोना संसर्ग कमी होत राहिला, लोक शिस्त पाळत राहिले तर 31 मे पासून अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्वरित अनलॉक करणे चांगले होणार नाही परंतु हळूहळू अनलॉक करणे सुरू होईल, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.