गुवाहाटी : आसामच्या सिल्चर मेडिकल कॉलेजमध्ये कोविड-19 आजारावरील कोविशील्ड या लसीचे तब्बल एक हजार डोस गोठलेल्या अवस्थेत आढळले आहेत. यानंतर आसामच्या आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. कोल्ड चेन स्टोअरजमधील बिघाडामुळे एसएमसीएचमध्ये कोरोना लसीचे डोस गोठले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आरोग्य सेवेचे (कुटुंब कल्याण) संचालक मुनींद्र नाथ नकाते म्हणाले की, "लसीचे डोस गोठले असल्याची माहिती आम्हाला मिळाली. कोल्ड स्टोअरेजमधील बिघाडामुळे डोस गोठले असावेत. परंतु याचं नेमकं कारण तपासणीनंतरच समोर येईल." गोठलेले डोस प्रभावी ठरतील का याबाबत विचारला असता नकाते म्हणाले की, "हे डोस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातील." "या घटनेत निष्काळजीपणा करणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाऊ शकते," असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान आरोग्य विभागाने लसीचे गोठलेले हे डोस खराब झाले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. शनिवारी या कोरोना लसीकरणाच्या अभियानाला सुरुवात झाल्यानंतरच लस गोठल्याचं समोर आलं, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेची सुरुवात 16 जानेवारीपासून झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन आणि कोविशील्ड लस दिली जात आहे. या दोन्ही लस साठवण्यासाठी 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते.

आसाममध्ये पहिल्या टप्प्यात 1 लाख 90 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं जाणार आहे. यासाठी एकूण 3 लाख 80 हजार लसीचे डोस आवश्यक आहेत. त्यासाठी कोविशील्डचे 2 लाख 1 हजार 500 आणि कोवॅक्सिनचे 20 हजार डोस देण्यात आले आहेत.

राज्यात सोमवारपर्यंत (18 जानेवारी) डॉक्टर, नर्स, रुग्णालयाचे कर्मचारी, लॅब लैब टेक्निशियन, अॅम्बुलन्स चालकांसह 5,542 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या लसीच्या पहिल्या डोसनंतर कोणालाही दुष्परिणाम जाणवले नाहीत.