Corona Vaccine साधारण वर्षभरापासूनच देशात आणि जगात दहशतीचं वातावरण निर्माण केलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गावर आता कुठे नियंत्रणात आणण्याचे काही मार्ग दिसू लागले आहेत. अर्थात हे प्रयत्न अद्यापही सुरुच आहेत. पण, अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसी हाताशी आल्यामुळं किमान या कोरोना युद्धात पाय रोवून उभं राहण्याचं धाडस सर्वजण करत आहेत. भारतही यात मागे नाही. काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली. ज्या धर्तीवर आता टप्प्याटप्प्यानं ही लस देशातील नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. यातच आणखी एक वळणही आलं आहे.


मंगळवारी केंद्राकडून ही बाब स्पष्ट करण्यात आली; 6 साथीदार (partner nations) राष्ट्रांना 20 जानेवारीपासून कोरोना लसीचा पुरवठा देशाकडून केला जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली. त्यांना काही शेजारी आणि मित्र राष्ट्रांकडून लसीचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.


'इतर राष्ट्रांकडून करण्यात आलेली विनंती आणि लस निर्मितीमध्ये भारताची असणारी कटीबद्धता, वितरण क्षमता यांच्या बळावर कोरोनाशी लढणाऱ्या मानवतेला सहकार्य करण्यासाठी म्हणून (Bhutan, Maldives, Bangladesh, Nepal, Myanmar and Seychelles) इथं लसींचा पुरवठा 20 जानेवारीपासून करण्यात येणार आहे', अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. शिवाय श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस या राष्ट्रांकडून भारत अधिकृत परवानगीच्या प्रतिक्षेत असल्याचंही सांगण्यात आलं.





भारताकडून यापूर्वीही मदतीचा हात...


मित्र राष्ट्रांना देशातील लसींची गरज लक्षात घेऊन टप्प्याटप्प्यानं लसींचा पुरवठा केला जाणार आहे, ही बाबही यावेळी स्पष्ट करण्यात आली. यापूर्वीही कोरोना काळात देशाकडून हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, रेमडेसिवीर आणि पॅरासिटामोल, मास्क, ग्लोव्ह्ज, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय साहित्याचाही पुरवठा मित्र राष्ट्रांना करण्यात आला होता.