मुंबई : राज्यात कोरोना (CoronaVirus) रुग्णसंख्या पुन्हा एकदा डोकं वर काढू लागली आहे. त्यामुळं या धर्तीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. राज्यात डिसेंबरनंतर रविवारी एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे 4 हजारांहून अधिक कोरोनारुग्ण आढळून आले.


रविवारी नव्यानं कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 4092वर पोहोचला होता. त्यामुळं ही बाब आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या चिंतेत भर टाकून गेली. परिणामी कोरोना रुग्णसंख्येचा हाच वाढता आलेख पाहता नागरिकांनीही कठोर निर्णयाच्या तयारीत राहावं असे संकेत अजित पवार यांनी दिले.


मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी बैठक घेऊन यामध्ये चर्चेतून काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील, त्यासाठी नागरिकांनी मानसिक तयारी ठेवावी असं पवारांनी नागरिकांना उद्देशून स्पष्टपणे सांगितलं. काही गोष्टींच्या बाबतीत वेळीच निर्णय न घेतल्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं म्हणत त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीला मिळालेल्या गंभीर वळणाचं चित्र जनतेपुढं ठेवलं.


Corona Update : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ



दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या मोठ्या फरकानं वाढू लागली आहे. अमरावतीमध्ये याच धर्तीवर 28 फेब्रुवारीपर्यंत गर्दी टाळण्यासाठी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये दुकानं मात्र सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता, हे प्रमाण असंच राहिल्याल लॉकडाऊनची आवश्यकता तूर्तास नाही असं म्हणाणाऱ्या शासकीय यंत्रणांना नाईलाजानं काही महत्त्वाचे आणि कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत याचीच दाट शक्यता आता दिसू लागली आहे.


विदर्भ, मुंबईत रुग्णसंख्या वाढ


राज्यात दररोज दिवसभरात हजारोंच्या संख्येनं वाढणाऱ्या कोरोना रुग्णांत 500 ते 600 नं भर पडू लागली आहे, अशी कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काही ठराविक ठिकाणी रुग्ण वाढत असल्याचं सांगत त्यांनी विदर्भ, मुंबईच्या दिशेनं सर्वांचं लक्ष वेधलं. परिणामी कोरोना प्रतिबंधासाठी आखण्यात आलेले नियम पाळाणे, ट्रॅकिंग करणे, ट्रेसिंग करणे आणि सोबतच योग्य त्या उपचार पद्धतींचा अवलंब करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. आपण केंद्रीय समितीच्या सूचना आम्ही पाळत असल्याचं सांगत त्याप्रमाणं कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवावे अशा सूचना करत, त्याचीही अंमलबजावणी सुरू केली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.