मुंबई : कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर बनत आहे. लसीकरण हा कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय दिसत आहे. मात्र लसीकरणाचा वेग वाढवायचा तर लसी तितक्या प्रमाणात उपलब्ध नाहीयेत. मात्र  देशात स्पुटनिक V लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याने लसीकरणाच वेग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा विचार केला जात आहे.


देशातील बर्‍याच कंपन्यांनी डोअर स्टेप (घरोघरी जाऊन) लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे संपर्क साधला आहे. पुढील काही दिवसांत याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. कोरोनाचा प्रसार देशात वेगाने सुरू आहे.  त्यासोबतच आतापर्यंत 10 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. स्पुटनिक V लसीच्या मंजुरीने आता लोकांना लस देण्यासाठी घरोघरी जाण्याचा विचार होत आहे.


Coronavirus | आळशी लोकांना कोरोनाचा धोका अधिक, संशोधनातून माहिती उघड


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत देशातील मोठ्या लोकसंख्येला लस देण्याची सरकारची योजना आहे. यासाठी 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना लस देण्याची योजना आखली जात आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या योजनेला परवानगी मिळताच लोकांना घरोघरी जाऊन लस देण्यासही मंजुरी मिळू शकते. 


लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतला ऑक्सिजन घेऊन रुग्णालयांना पुरवणार, राजेश टोपेंची माहिती


लसीकरणासाठी प्रति व्यक्ती 25 ते 37 रुपये आकारण्याचा प्रस्ताव


अनेक फार्मा कंपन्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव दिला आहे, ज्यामध्ये या कंपन्यांनी लोकांच्या घरी जाऊन लसीकरणाचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र यासाठी या कंपन्यांनी प्रति व्यक्ती 25 ते 37 रुपये आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणत्याही कंपनीला परवानगी मिळाली नाही. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर लोकांना घरी जाऊन लस देण्याची व्यवस्था केली गेली तर सुरुवातीच्या टप्प्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालय केवळ आपल्या सरकारी नेटवर्कचा वापर करेल. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की,  येत्या काही महिन्यांत देशातील प्रौढ जनतेचं लसीकरण पूर्ण होईल. येत्या काही महिन्यांत लवकरच आणखी काही लसींना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार अन्य वयोगटातील लोकांना लस देण्यास  लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे