नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशातच मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. अखेर आज सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 4 मे पासून सुरु होणारी सीबीएसईची बारावीची परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेबाबत एक जूनला फेरआढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर किमान 15 दिवस आधी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.


आज दुपारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसई परीक्षांसंदर्भात घोषणा केली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. 


पाहा व्हिडीओ : सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द; बारावीची परीक्षा लांबणीवर



केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले की, "अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविले जाईल. जर विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील, तर ते कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षा देऊ शकतात."


सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्र यापूर्वीच जारी करण्यात आलं होतं. बोर्डाच्या परीक्षा मेपासून सुरु होऊन 10 जूनपर्यंत सुरु राहणार होत्या. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल 15 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. सीबीएसईच्या या बोर्डाच्या परीक्षांची सुरुवात 4 मेपासून होणार होती. वेळापत्रकानुसार, 6 मे रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजीची परीक्षा आयोजित करण्यात येणार होती. 10 मे रोजी हिंदी, 11 मे रोजी उर्दू, 15 मे रोजी विज्ञान, 20 मे रोजी होम सायन्स, 21 मे रोजी गणित आणि 27 मे रोजी सामाजिक विज्ञानाची परीक्षा होणार होती. 


CBSE दहावी-बारावीची परीक्षा रद्द करा, अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारकडे विनंती


कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करावी अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे. राजधानी दिल्लीला कोरोनाचा हॉटस्पॉट बनवण्यापासून वाचवायचं असेल तर या परीक्षा रद्द कराव्या, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. लाखो विद्यार्थी आणि सुमारे एक लाख शिक्षक परीक्षेच्या प्रक्रियेत सहभागी होणं म्हणजे राजधानी दिल्ली कोरोनाचा हॉटस्पॉट बनेल आणि त्यानंतर परिस्थिती हाताळणं कठीण होईल.


महाराष्ट्रातील दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.