नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सामना करताना देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे जगभरातून भारताला मदतीचा ओघ सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. आता रशियाच्या Sputnik V लसीची पहिली खेप आज भारतात दाखल होणार आहे. यामध्ये जवळपास अडीच लाख लसीचे डोस असतील असं सांगण्यात येतंय. 


देशात आजपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. पण अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या लसीचा पुरेसा साठाच उपलब्ध नसल्याने या तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी त्यांना करता येत नाही. अशा वेळी रशियाच्या Sputnik V लसीची पहिली खेप भारतात दाखल होत आहे हे काहीसं दिलासादायक आहे. 


Sputnik V चे आज अडीच लाख डोस पाठवण्यात येत आहेत तर या महिन्याच्या शेवटीपर्यंत  30 लाख डोस पोहोचवण्यात येतील असंही रशियाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रशियातील भारतीय राजदूत बाला व्यंकटेश वर्मा यांनी सांगितलं की, रशियन लस Sputnik V चा भारतातील  लसीकरणाच्या कार्यक्रमात लवकरच वापर करण्यात येईल. Sputnik V च्या वापराला भारतात 12 एप्रिलला परवानगी देण्यात आली होती. 


कोरोनाव्हायरसच्या संसर्गाविरूद्ध रशियन  Sputnik V लस वापरण्यास अधिकृत  मान्यता देणारा भारत जगातील 60 वा देश ठरला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या, काही अब्ज किंवा 40 टक्के लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आता या लसीच्या वापरास मंजुरी मिळाली आहे. 


रशियाची कोरोना लस Sputnik V कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या तुलनेत जास्त परिणामकारक असल्याचा दावा केला जातोय. रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने दावा केलाय की Sputnik V लस ही 91.6 टक्के प्रभावी आहे. कोविशिल्ड ही 80 टक्के तर कोवॅक्सिन ही 81 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. भारतात सध्या या दोन लसींचा वापर कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये केला जातोय. या दोन लसींचे महिन्याला सात कोटी डोसचे उत्पादन करण्यात येतंय. Sputnik V लस आल्यानंतर या लसींवरची निर्भरता कमी होईल असंही सांगण्यात येतंय. 


महत्वाच्या बातम्या :