Thiruvananthapuram : केरळमध्ये कोरोना केसेस (Covid-19) वाढत चालल्याने राज्य सरकारकडून गर्भवती महिला तसेच व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना मास्क सक्तीचा (Kerala Makes Masks Must For Pregnant Women, Elderly) निर्णय घेतला आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जाॅर्ज (Health Minister Veena George) यांनी याबाबत घोषणा केली आहे. वृद्ध आणि अंथरुणाला खिळलेल्या रूग्णांचे या आजारापासून संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील कोविड-19 परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, कोविड-19 मुळे होणारे मृत्यू बहुतेक 60 वर्षांवरील लोकांमध्ये आणि मधुमेहासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजार असलेल्या लोकांमध्ये नोंदवले जातात.
ओमिक्रॉन प्रकाराने सर्वाधिक लोक संक्रमित
आरोग्य विभागाने सर्व जिल्हा रुग्णालयांना योग्य कोविड-19 मूल्यमापन करण्याच्या सूचना दिल्या असून कोरोनाच्या रुग्णांची वाढ लक्षात घेऊन सर्ज योजनेनुसार सुविधा वाढविण्याचे निर्देश दिले. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कोविड-19 मुळे 85 टक्के मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मंत्र्यांनी ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले असून लवकरच खासगी रुग्णालयांची विशेष बैठक घेण्यात येईल असे सांगितले. ताज्या चाचणीनुसार, ओमिक्रॉन प्रकाराने सर्वाधिक लोक संक्रमित झाल्याचे आढळले आहेत.
0.8 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता
केरळमध्ये शनिवारी 1,801 कोविड-19 केसेसची नोंद झाली. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एर्नाकुलम, तिरुवनंतपुरम आणि कोट्टायम जिल्ह्यात सर्वाधिक केसेसची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्री वीणा जाॅर्ज अधिक माहिती देताना म्हणाल्या की, आम्ही चाचण्या वाढवल्या आहेत. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण थोडे वाढत आहे. तथापि, एकूण रुग्णांपैकी फक्त 0.8 टक्के रुग्णांना ऑक्सिजनच्या आधाराची आवश्यकता असते तर 1.2 टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल केले जात आहे.
घरातील अंथरुणाला खिळलेले रुग्ण आणि वृद्ध लोकांची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांना कोविड-19 ची बाधा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. जे वृद्ध आणि अंथरुणाला खिळलेले आहेत किंवा ज्यांना घरात जीवनशैलीचे आजार आहेत त्यांनी काटेकोरपणे अतिरिक्त काळजी घ्यावी आणि मास्क वापरा आणि साबणाने हात धुवा, असे आवाहन राज्यातील जनतेला राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. वयोपरत्वे आजारी असलेल्या लोकांना, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि लहान मुले यांना सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालण्याची विनंती करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या