Prisoners HIV Positive : उत्तराखंडमधील (Uttarakhand) हल्द्वानीमधून (Haldwani) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. हल्दवानी येथील कारागृहातील 44 कैदी हे एचआयव्ही (HIV) संक्रमित असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने हल्द्वानी कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. या सर्व कैद्यांवर हल्दवानी येथील सुशीला तिवारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


कैद्यांची नियमित वैद्यकीय तपासणी सुरु 


हल्द्वानी कारागृहात एचआयव्ही बाधित कैद्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात आढळून आलेले एचआयव्ही बाधित कैदी हे ड्रग्ज व्यसनी आहेत. सध्यास्थितीत हल्दवानी कारागृहात 1629 पुरुष आणि 70 महिला कैदी आहेत. दरम्यान, यातील 44 कैदी हे एचआयव्ही संक्रमित कैदी आढळल्याने कारागृह प्रशासने कैद्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळं एचआयव्ही संक्रमित आढळलेल्या कैद्यांवर योग्य वेळी उपचार करणे शक्य होईल. एचआयव्ही संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी एआरटी सेंटर तयार करण्यात आल्याची माहिती सुशीला तिवारी हॉस्पिटलचे डॉ. परमजीत सिंह यांनी दिली आहे.


कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह 


सध्या कारागृहातील कैद्यांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. एचआयव्ही संक्रमित रुग्णांवर निशुल्क उपचार करण्यात येत आहे. यासाठी एक विशेष टीम कार्यरत आहे. परंतू कारागृह अधिक्षक प्रमोद कुमार पांडे यांनी या घटनेबद्दल काही बोलण्यास नकार दिला आहे. अशातच या प्रकरणामुळं कारागृह प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. एचआयव्हीचे संक्रमण हे एकमेकांपासून होते. त्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली असली तरी, कारागृह प्रशासन या घटनेनंतर सतर्क झाल्याचे माहिती देण्यात आली आहे.


कारागृहात  महिन्यातून दोन वेळा तपासणी 


सुशीला तिवारी हॉस्पिटलचे  डॉ. परमजीत सिंह यांनी सांगितले की, हॉस्पिटलची टीम महिन्यातून दोनदा कारागृहात नियमित तपासणी करण्यासाटी जाते. सर्वच कैद्यांची तपासणी केली जाते. ज्यांना किरकोळ त्रास होतो त्यांना औषध देऊन जागेवरच बरे केले जाते. ज्यांना जास्त त्रास होतो त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जातात. दरम्यान, एचआयव्ही बाधित कैद्यांवर वेळीच उपचार व्हावेत, यासाठी कारागृह प्रशासन कैद्यांची नियमित तपासणीही करत आहे. एचआयव्ही रुग्णांसाठी एआरटी केंद्र सुरू करण्यात आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Beed News : आई-वडील HIV बाधित म्हणून मुलाला शाळेत बसू दिलं नाही, बीडमधील धक्कादायक घटना