नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असले तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात अजून सामुदायिक संसर्ग (community transmission) झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढू लागल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे बोलले जात होते. यावर देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने, देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव (Balram Bhargav) यांनी म्हटले आहे.

डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, छोट्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे तर शहरी भागात हे प्रमाण फक्त एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारत खूप मोठा देश आहे आणि त्यादृष्टीने प्रभाव कमी आहे. भारतात समूह संसर्ग झालेला नाही. आम्हाला आढळले आहे की छोट्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे, शहरी भागात तो एक टक्क्यांपेक्षा थोडा जास्त असं भार्गव म्हणाले.

मुंबईत 'कम्युनिटी ट्रान्समिशन' नसल्याचे 'फिव्हर क्लिनिक'च्या आकडेवारीवरून स्पष्ट

देशभरात लॉकडाऊन करत आपण जी पावलं उचलली त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आणि वेगाने त्याचा होणार फैलाव थांबवण्यात यश मिळालं असल्याचं देखील ते म्हणाले. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग सोबत अलग ठेवण्याचे उपाय आणि देशातील सध्याच्या उपाययोजना चालू ठेवणे आवश्यक आहे. यामुळेच आपण कोरोनाचा संसर्ग वाढण्यावर अंकुश ठेवून आहोत.

आता आपण दररोज 1.51 लाख चाचण्या करत  आहोत आणि दररोज 2 लाख चाचण्या घेण्याची क्षमता आपल्याकडे आहे. देशात 50 लाख चाचण्या आतापर्यंत पार केल्या आहेत. देशात कोरोना चाचण्यांसाठी राज्य सरकारांनी सरकारी आणि खासगी दोन्ही प्रयोगशाळेचा वापर करावा, असेही त्यांनी आवाहन देखील त्यांनी केले.

भारतात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंच 298,283 म्हणजे जवळपास तीन लाख लोकांना कोरोनाची लागण झालीय तर आतापर्यंत 8,501 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे.

हेही वाचा- BLOG | समूह संसर्गाची लागण?