Corona Cases Today : भारतात कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्यानं घट होताना दिसत आहे. 27 जूनपासून सलग 50 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 43,071 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारी 44,111 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 52,299 रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले आहेत.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 5 लाख 45 हजार 433
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 96 लाख 58 हजार 78
एकूण सक्रिय रुग्ण : 4 लाख 85 हजार 350
एकूण मृत्यू : 4 लाख 2 हजार 5
देशात सलग 52व्या दिवशी कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 3 जुलैपर्यंत देशभरात 35 कोटी 12 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले होते. काल दिवसभरात 67 लाख 87 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 42 कोटी कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 18 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्के आहे.
देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. अॅक्टिव्ह रुग्ण 2 टक्क्यांहून कमी आहेत. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारताचा तिसरा क्रमांक आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
शनिवारी राज्यात 8,395 रुग्ण बरे होऊन घरी, 9,489 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल 8,395 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 9,489 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस एक लाख 17 हजारांच्या वर आहेत. काल मालेगावमध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1289 तर कोल्हापूर शहरात 376 असे एकूण 1665 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काल सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 38 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96 टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,23,20,880 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,88,841 (14.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,32,949 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,422 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 575 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत कोरोनाचा आकडा काही दिवसांपासून रोजचा हजाराच्या आता येत असल्याचं चित्र आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 575 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,97,991 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8,297 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 752 दिवसांवर गेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :