Booster Dose : कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. बायोलॉजिकल ईची कोरोना लस असलेल्या कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) या लशीला 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी बूस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI ) ही मान्यता दिली आहे. त्यामुळे कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सीन लसीचे दोन्ही डोस घेतलेले 18 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाचे नागरिक आता आपत्कालीन परिस्थितीत कॉर्बेव्हॅक्स लस बूस्टर डोस स्वरुपात घेऊ शकणार आहेत. 






DCGI ने एप्रिलच्या अखेरीस 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी कॉर्बेव्हॅक्सला मंजूरी दिली होती. तोपर्यंत ही लस 12 ते 14 वयोगटातील मुलांना दिली जात होती.


कॉर्बेव्हॅक्सच्या किंतीत कपात 
बायोलॉजिकल ई ने मे मध्ये खासगी लसीकरण केंद्रांसाठी कॉर्बेव्हॅक्सची किंमत प्रति डोस  840 रूपयांवरून  250 रूपयांपर्यंत कमी केली होती. कंपनीने सांगितले की कॉर्बेवॅक्स ही भारतातील पहिली लस आहे जिला  हेट्रोलोगस कोविड बूस्टर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. बायोलॉजिकल ई चा कॉर्बेवॅक्स बूस्टर डोस कोवॅक्सीन किंवा कोविशील्डच्या दोन डोसच्या सहा महिन्यांच्या आत दिला जाऊ शकतो.


लसीच्या अंतरिम सुरक्षा आणि इम्युनोजेनिसिटी डेटाच्या पुनरावलोकनावर आधारित विषय तज्ञ समितीने  शिफारस केल्यानंतर ही मान्यता मिळाली आहे. ही मान्यता 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लस मंजूर झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर मिळाली आहे. बायोलॉजिकल ई ने जारी केलेल्या निवेदनानुसार, या कॉर्बेवॅक्सला मान्यता मिळणे देशाच्या लसीकरण प्रवासातील एक मैलाचा दगड ठरेल, असे म्हटले आहे.  


दरम्यान, गेल्या काही दिवासांपासून देशभरात कोरोना रूग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात 1357 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 595 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 889 रुग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.