मुंबई: स्टॅम्प घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू झाला. तेलगी गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होता. अवयव निकामी झाल्याने तेलगीचा मृत्यू झाला.


तेलगीवर बंगळुरुच्या व्हिक्टोरिया रूग्णालयात उपचार सुरु होते. त्याल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

अब्दुल करीम तेलगी हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर स्टेशन रोड येथील रहिवाशी होता. अब्दुल करीम तेलगीने केलेल्‍या कोट्यवधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळा उघडकीस आल्यानंतर, संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली होती. त्याचा भाऊ अजिम तेलगी हा खानापूर नगरपालिकेचा विद्यमान उपनगराध्यक्ष असून, या घोटाळ्याप्रकरणी त्यालाही अटक करण्यात आली होती.

अब्दुल करीम आणि त्याच्या भावांनी नाशिक येथील प्रिटिंग प्रेसमधील जुनी मशिनरी आणून हा बनावट मुद्रांक व्यवसाय थाटला होता. या व्यवसायाला शेजारील पाकिस्तान आणि बांगलादेश येथून छुपे पाठबळ होते.

यापूर्वी तेलगी याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्याने पत्नी आणि मुलीची भेट व्हावी आणि विविध आजाराने त्रस्त असल्याच्या कारणाने न्यायालयाला आपल्याला बंगळुर येथील कारागृहात ठेवण्यात यावे, असा विनंती अर्ज केला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याला बंगळुरु येथील परप्पन अग्रहार कारागृहात ठेवले होते.

तेलगीने बेळगाव जिल्‍ह्‍यातील खानापूर तालुक्यासह मुंबई, पुणे आदी ठिकाणी या बनावट मुद्रांक विक्रीतून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केली होती.