हैदराबाद : क्रॉस कंट्री बाईकर सना इक्बालचा हैदराबादमध्ये कार अपघातात मृत्यू झाला. सना पतीसोबत जात असताना कार डिव्हायडरवर आपटून हा अपघात घडला. सनाच्या आईने तिच्या पतीवर आरोप केले आहेत.


मंगळवारी सकाळी सना इक्बाल पती अब्दुल नदीमसोबत कारने जात होती. त्यावेळी हैदराबादमध्ये त्यांची कार दुभाजकावर आदळली. अपघातात 30 वर्षीय सनाचा मृत्यू झाला, तर पती अब्दुलची दोन हाडं मोडली. सना आणि इक्बालला 2015 मध्ये मुलगा झाला होता.

हा अपघात नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप सनाच्या माहेरच्यांनी केला आहे. त्यांनी नरसिंगी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून प्रथमदर्शनी हा अपघातच वाटत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

'सना आणि तिच्या पतीमध्ये काही मतभेद असतील, मात्र वरकरणी हा अपघातच वाटत आहे. घटनास्थळाला भेट दिली असता त्यांच्या वाहनाचं नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचं दिसतं' असं पोलिस म्हणाले.

नैराश्य आणि आत्महत्येविरोधात जनजागृती करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेत सना अग्रस्थानी होती. तिने 38 हजार किलोमीटरच्या क्रॉस कंट्री राईडमध्ये भाग घेतला होता.

नदीम आणि त्याची आई सनाला पैशासाठी वारंवार त्रास देत असल्याचा आरोप सनाचे मित्र आणि कुटुंबीयांनी केला आहे. त्याच्या जाचामुळे ती फक्त 3-4 महिनेच नवऱ्यासोबत राहिली, असं सनाच्या बहिणीने सांगितलं.

मंगळवारी नदीम तिला नेण्यासाठी घरी आला होता. तिने नकार दिल्यामुळे तो चिडला. मात्र अखेर तो सनाला घेऊन गेला. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी तिच्या मृत्यूची बातमी आली, असं सनाच्या कुटुंबाने सांगितलं.