नवी दिल्ली: भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून दुसऱ्यांदा  कौन्सुलर एक्सेस मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय. याबाबत भारताच्या परराष्ट्र खात्यानं पत्रकार परिषद घेतली. याप्रकरणी भारत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे)चा दरवाजा ठोठोवू शकतो, असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केलंय.

परराष्ट्र मंत्रालयानं घेतलेल्या या पत्रकार परिषदेत प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं की, २ सप्टेंबरला मिळालेला कौन्सुलर एक्सेस आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (आयसीजे) निर्देशानुसार मिळाला होता. आम्ही पाकिस्तानला नेहमीच 'आयसीजे'च्या निर्देशांचं पालन करण्याबाबत सांगितलं आहे. आम्ही अजूनही पाकिस्तानच्या संपर्कात आहोत.

पाकिस्ताननं नुकतंच संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क समितीमध्ये काश्मिर आणि तिथल्या सद्यस्थितीची मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना रवीश कुमार म्हणाले की,  पाकिस्तानला यावर राजकारण करायचंय हे स्पष्ट आहे. पाकिस्तानचा दुतोंडीपणा आणि दहशतवादाला तो करत असलेली मदत जगाला माहित आहे. पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र आहे. खोटा प्रचार करण्याचा पाकिस्तानचा सदैव प्रयत्न राहिलाय. ४-५ वेळा एकंच खोटं सांगितल्यानं ते खरं ठरत नाही. जगाला पाकिस्तानचा हा खोटारडेपणा माहित आहे.

कुलभूषण जाधव यांना 'हेरगिरी आणि दहशतवादा'च्या आरोपांखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं एप्रिल २०१७मध्ये मृत्यदंडाची शिक्षा सुनावली होती. यानंतर भारतानं 'आयसीजे'मध्ये जाऊन जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती ज्यात भारताला यशही आलं.


यापूर्वी कुलभूषण यांच्या आई व बहिण यांना पाकिस्ताननं भेटायची परवानगी दिली होती. मात्र, कुलभूषण यांच्याशी भेटीदरम्यान पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना त्रास दिला गेल्याचंही समोर आलं होतं.