नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तातडीने पक्षाची धुरा खांद्यावर घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. विशेष म्हणजे या मागणीला खुद्द माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही अनुमोदन दिलं आहे. आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळं अनुपस्थित होत्या. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.
याचवेळी ए. के. अँटोनी आणि इतर नेत्यांनी राहुल गांधींनी पक्षाची कमान हाती घेण्याचा आग्रह धरला. पक्षातील नेते, कार्यकर्त्यांची इच्छा सोनिया गांधींना कळवली जाईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही अँटोनी यांनी सांगितले.
दरम्यान, आजच्या कार्यकारिणीत राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकार सत्तेच्या नशेत आहे. जे त्यांना प्रश्न विचारतात, त्यांची मुस्कटदाबी सुरु आहे, असं म्हणत राहुल गांधींनी एनडीटीव्हीवरच्या बॅनचा मुद्दाही उचलून धरला.
तसेच, वन रँक वन पेन्शनचा मुद्दा आणि धगधगतं काश्मीर या प्रश्नावरही सरकार सपशेल फेल ठरल्याचं राहुल गांधी म्हणाले.