केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या गाडीवर अंडीफेक, 5 काँग्रेस कार्यकर्ते अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2017 05:05 PM (IST)
भुवनेश्वर (ओदिशा) : देशभरात सध्या शेतकरी संपाचा भडका पाहायला मिळतो आहे. याचाच संताप आज ओदिशातील भुवनेश्वरमध्ये पाहायला मिळाला. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या कारवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अंडी फेकण्यात आली. राधामोहन सिंह हे एका कार्यक्रमासाठी भुवनेश्वरमध्ये आले होते. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांच्या संपानंतर विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. राधामोहन सिंह हे सिंह भुवनेश्वरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी तेथील गेस्ट हाऊसवर थांबले होते. जसा त्यांच्या संपूर्ण ताफा बाहेर निघाला त्याचवेळी तिथं असणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या कारवर अंडी फेकली. मध्यप्रदेशमधील मंदसौर गोळीबारात 6 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. ज्यामुळे नाराज होऊन कृषीमंत्र्यांविरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं. अंडीफेक करणाऱ्या यूथ काँग्रेसच्या 5 कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे. गेली 8 दिवस महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असताना कृषीमंत्री मात्र बाबा रामदेव यांच्यासह योगा करण्यात दंग होते. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका सुरु आहे. संबंधित बातम्या: शेतकरी रस्त्यावर, मात्र देशाचे कृषीमंत्री योगा करण्यात मग्न शेतकरी संपानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं अनिश्चित काळासाठी उपोषण