चंदीगड : पंजाबचा विजय काँग्रेसला मोठा दिलासा देणारा आहे. सततच्या पराभवाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये या विजयाने उत्साह नक्कीच संचारला असेल. सत्ताधारी अकाली दल आणि भाजपवर मात करत काँग्रेसने अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पंजाबची सत्ता काबीज केली.


वाढदिवसाच्या दिवशीच काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचं गिफ्ट मिळालं. विशेष म्हणजे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना आपल्याच टीमच्या कॅप्टनवर विश्वास नव्हता. 117 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने 77, आप 20 आणि अकाली दल 15, तर भाजपने 3 जागा मिळवल्या.

अकाली दल-भाजपचा पराभव कशामुळे?

अकाली दल आणि भाजपच्या युती सरकारवर पंजाबमध्ये नाराजी होती. रोजगार, शेत मालाला भाव आणि जो ड्रग्ज माफियांना तुरुंगात पाठवेल असा, नेता पंजाबला हवा होता. त्यामुळे सरदारांनी 77 जागा काँग्रेसच्या पारड्यात टाकत अखेर बदल केलाच.

भाजपला रामराम केलेल्या नवज्योत सिंह सिद्धुचाही काँग्रेसला फायदा झाला. कारण अमृतसर परिसरातल्या पाचही जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे सिद्धूंना उप मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. तर 80 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या 'आप'ला पंजाबच्या मतदारांनी नाकारलं.

अकाली दल आणि भाजपची पंजाबमध्ये धुळधाण झाली. तर बादल कुटुंबियांच्या सदस्यालाही पराभव दाखवला. मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल वयाच्या 89 व्या वर्षी निवडून येत पंजाबचे सर्वात वयोवृद्ध उमेदवार ठरले, उपमुख्यमंत्री सुखबिर बादल, ड्रग्ज माफियाचा आरोप असलेले बिक्रमसिंह मजेठिया विजयी झाले आहेत. तर सुनबाई हरप्रित कौर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

विजय काँग्रेसचा की कॅप्टन अमरिंदर सिंहांचा?

पंजाबचा विजय काँग्रेसला मोठा बूस्ट देणारा आहे. कॅप्टन अमरिंदर सिंहाच्या आश्वासनावर विश्वास ठेवत सरदारांनी काँग्रेसला विजयी केलं आणि अकाली दल-भाजप युतीला पराभव दाखवला. पण काँग्रेसच्या या विजयावर एक प्रश्नचिन्ह आहे, ते म्हणजे हा विजय काँग्रेस पक्षाचा आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा?

अमरिंदर सिंह यांनी पक्षाच्या विरोधात जात विविध डावपेच आखले. सिद्धूंना पक्षात घेत अमरिंदर मतदार संघात काँग्रेसची ताकद आणखी मजबूत केली. शिवाय ड्रग्जच्या मुद्द्यावर सरदारांचं मनपरिवर्तन करण्यात त्यांना यश आलं.