नवी दिल्ली : येत्या दहा दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाला राहुल गांधींच्या ऐवजी नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असून ते आपला निर्णय मागे घेण्याची सुतराम शक्यता नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय पक्षाचा नवा अध्यक्ष हा गांधी घराण्यातला नको, गांधी घराण्याबाहेरचे नाव सुचवा असेही राहुल गांधींनी म्हटले आहे. त्यामुळे आता नवा काँग्रेस अध्यक्ष कोण असणार? याची चर्चा सुरु झाली आहे.

काल झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावरुन जोरदार मंथन झाले. त्यात राहुल गांधींनी दिलेला राजीनामा कार्यकारिणीने नाकारला. राहुल यांना पक्षाची पुर्नरचना करण्याचे सर्वाधिकारही देण्यात आले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाची नवी रचना कशी असणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.

दरम्यान एकाच वेळी काँग्रेसचे चार कार्यकारी अध्यक्ष नेमले जाणार असल्याचीही चर्चा रंगत आहे. परंतु या चार कार्यकारी अध्यक्षांमध्येही प्रियंका गांधी यांचे नाव नसणार हे निश्चित आहे. कारण घराणेशाहीच्या आरोपातून काँग्रेसला मुक्त करण्यासाठीच राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे 2019 च्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.

व्हिडीओ पाहा



काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधींच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास दाखवला असला तरी त्यांच्या ऑफिसच्या कार्यशैलीबाबत मात्र काहींनी नाराजी व्यक्त केली. निखिल अल्वा, के. राजू, संदीप सिंह यांच्यासारखे राहुल यांचे अनेक सहकारी हे डाव्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे पक्षाची दिशा चुकत असल्याचा अनेकांचा आरोप होता.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या या बैठकीत जे लोक चिंतनासाठी बसले होते, त्यापैकी अनेकांना पराभवाचा झटका बसला आहे. राहुल गांधी स्वतः अमेठीतून हरले आहेत. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेदेखील हरले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, आरपीएन सिंह, सुषमासिंह देव हे सर्व काँग्रेसचे बडे नेतेदेखील पराभूत झाले आहेत. त्यामुळे सीडब्लूसीत कोण कोणाकडे बोट दाखवणार हा प्रश्न होताच. आता या मंथनातून काँग्रेस पक्ष खरंच काही क्रांतिकारी बदल करणार का? की पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच पाहायला मिळणार, हे लवकरच कळेल.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावर राहुल गांधींचा राग | नवी दिल्ली | एबीपी माझा



दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर गांधी कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने राजीनामा सादर करायचा, आणि त्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीने तो नाकारायचा, असे नाट्य याहीआधी घडलेले आहे. त्यामुळे आज त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. सलग दोन मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस पक्ष आता स्वतःच्या कार्यशैलीबद्दल गांभीर्याने विचार करणार का? नव्या पुनर्ररचनेत राहुल गांधी काही धाडसी निर्णय घेणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.