नवी दिल्ली: काँग्रेसला आता गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार हे नक्की झालं असून अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी (AICC President Polls) नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. अध्यक्षपदासाठी 24 ते 30 सप्टेंबर या काळात अर्ज भरण्यात येणार असून काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण हे 19 ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.
असं आहे निवडणुकीचं वेळापत्रक
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे प्रमुख मधुसुदन मिस्त्री यांनी आज यासंबंधित नोटिफिकेशन जारी केलं आहे. या मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर या अर्जांची पडताळणी करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची वेळ 8 ऑक्टोबर पर्यंत असेल.
या काळात जर एकापेक्षा अधिक अर्ज उरले असतील तर अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीचा निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
काँग्रेसची अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचं राहुल गांधी यांनी या आधीच जाहीर केलं आहे. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत असून हे दोन्ही नेते निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस नेत्या आणि प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी या 1998 पासून काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आहेत. मधल्या दोन वर्षांच्या काळात म्हणजे 2017 ते 2019 या काळात राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा आली. नंतर पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली.
गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे 2014 नंतर काँग्रेस पक्षाची सर्व निवडणुकांमध्ये पिछेहाट सुरू असल्याचं दिसून येतंय. 2014 नंतर झालेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससाच दारूण पराभव झाला. त्यानंतर अनेक राज्यांमधील सत्ता काँग्रेसने गमावली. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेपदाच्या काळात काँग्रेसची जबरदस्त पिछेहाट झाली.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष आता काँग्रेसला तारणार का हे येत्या काळात पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या :