Prashant Kishor : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने पक्ष मजबूत करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. यामध्ये निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी बुधवारी (20 एप्रिल) राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली. गेल्या पाच दिवसात प्रशांत किशोर हे चौथ्यांदा सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यामुळे पुढच्या 48 तासामध्ये काँग्रेस नेतृत्व मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, किशोर यांनी दिलेल्या सूचनांनुसार, पुढील एक-दोन दिवसांत चर्चेची फेरी संपेल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत किशोर यांनी गेहलोत आणि बघेल यांच्यासमोर आपली रणनिती मांडली आहे. त्यांनी काही अतिरिक्त सूचनाही केल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते अंबिका सोनी आणि सुरजेवाला उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या सूचनांवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. येत्या निवडणुकीत काँग्रेस संघटना अधिक प्रभावी करणे, संघटनात्मक बदल करणे, लोकांच्या अपेक्षेनुसार संघटना करणे आदी गोष्टींचा या सूचनांमध्ये समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून या सूचनांवर सखोल चर्चा सुरु आहे. गेल्या पाच दिवसात प्रशांत किशोर चौथ्यांदा सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. किशोर यांनी सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पुढील लोकसभा निवडणुकीची रणनिती देखील सादर केली आहे.
उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिसासारख्या काही राज्यांमध्ये काँग्रेसने आपली रणनिती नव्याने बनवावी आणि या राज्यांमध्ये युती टाळावी, अशी सुचना प्रशांत किशोर यांनी दिली आहे. प्रशांत किशोर यांनी त्यांच्या सादरीकरणात असेही म्हटले आहे की, काँग्रेसने लोकसभेच्या सुमारे 370 जागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. काँग्रेसने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये युती करुन निवडणूक लढवावी अशी सुचनाही प्रशांत किशोर यांनी केली आहे.