नवी दिल्ली : भारताला सहाव्यांदा मिस वर्ल्डचा किताब मिळवून देणाऱ्या मानुषी छिल्लरवर देशभरातून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी मानुषीचा नोटाबंदीशी संबंध जोडत वादग्रस्त ट्वीट केलं आहे.

नोटाबंदी ही केवढी मोठी चूक होती. भाजपला समजायला हवं होतं, की आपलं चलन जगावर राज्य करतं. आता तर आपली छिल्लरही मिस वर्ल्ड बनली आहे, असं ट्वीट शशी थरुर यांनी केलं. मात्र ट्रोल करण्यात आल्यानंतर त्यांनी हे ट्वीट डिलीट केलं.

शशी थरुर यांनी नोटाबंदीवर टीका करताना मानुषीच्या आडनावाला चलनातील चिल्लरसोबत जोडलं. यानंतर त्यांना ट्विटरवर टीकेचाही सामना करावा लागला. दरम्यान यानंतर त्यांनी मानुषी छिल्लरचं अभिनंदन करणारं ट्वीटही केलं.

भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास रचला. 20 वर्षीय मानुषी ही राजधानी दिल्लीत राहते. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. चीनमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिथे मानुषीने इतिहास रचला.

मिस वर्ल्ड 2017 स्पर्धेमध्ये एकूण 118 प्रतिस्पर्धींनी सहभाग घेतला होता. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इंग्लंडच्या स्टेफिनी हिलला मिळालं. तर मेक्सिकोची अँड्रिया मीझा दुसरी रनर अप ठरली.

प्रियंका चोप्रानंतर तब्बल 17 वर्षांनी एखाद्या भारतीय सुंदरीने या किताबावर आपलं नाव कोरलं आहे. यापूर्वी 2000 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने या किताबावर नाव कोरलं होतं.

संबंधित बातम्या :

भारताच्या मानुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब


भारत सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या देशांच्या यादीत


या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!