अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरुन भाजपमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हं आहेत. भाजपचे पंचमहल मतदार संघाचे खासदार प्रभात सिंह चौहान यांनीही बंडखोरीची भाषा केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
पत्नीला विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही, तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, असा इशारा प्रभात सिंह चौहान यांनी दिला आहे.
यापूर्वीही पाटनचे भाजप खासदार लीलाधर वाघेला यांनीही बंडखोरीची भाषा केली होती. मुलाला तिकीट दिलं नाही, तर खासदारकीचा राजीनामा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता.
भाजपने गुजरातमध्ये आतापर्यंत 182 पैकी 106 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. म्हणजे अजून 76 उमेदावारांची यादी जाहीर करणं बाकी आहे. कोणत्याही क्षणी ही यादी जाहीर केली जाऊ शकते.
आतापर्यंत सात विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं नाही. तर पाटीदार समाजाच्या नेत्यांना जास्त प्रमाणात तिकिटं देण्यात आली आहेत. काँग्रेसमधून भाजपात आलेल्यांनाही तिकिटं दिली आहेत.