नवी दिल्ली: पाच राज्यांमध्ये झालेला पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं चित्र आहे. याची जबाबदारी घेऊन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आपापल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये हे तिघेही आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जातंय. एनडीटीव्हीच्या वृत्ताच्या हवाल्याने सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 


काँग्रेस पक्षाकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत स्पष्टता देण्यात आली नाही. काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित राहणार आहेत.


उत्तर प्रदेश , उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. पंजाबसारखं मोठं राज्यही काँग्रेसच्या हातून गेलं आहे, तर गोव्यामध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. पण त्या राज्यामध्ये पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या, त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी आणि रायबरेली या ठिकाणीही काँग्रेसला पक्षाचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत. 


त्याचवेळी आम आदमी पक्षाने काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसकडून पंजाब हिसकावून घेतलं आहे. पंजाबमधील हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. 


पाच राज्यांतील झालेल्या या पराभवानंतर गांधी परिवारावर आणि काँग्रेसच्या घराणेशाहीवर चांगलीच टीका होत आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत गांधी परिवारातील हे तीनही सदस्य राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


संबंधित बातम्या: